Saturday, 15 September 2018

इंजिनियरिंगचा समुद्र

इंजिनियरिंग कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश केल्यावर सहजगत्या कोणालाही विचारलत कि तुला काय व्हायला आवडेल ? तर अर्ध्याहुन जास्त जणांनकडून 'इंजिनियर सोडून अमुक तमुक व्हायला आवडेल' असच उत्तर येइल. शहराच्या एका कोपऱ्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या ह्या चाळीस एकराच्या कॅम्पस मधल प्रत्येक डोक हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेलि स्वतंत्र्य शाखा आहे . इथला शिपाई सुधा करंट अफेयर्स,मराठी साहित्य असल्या विषयांवर तुमच्याशि तासभर बोलायला कमि पडणार नाही. हे कॉलेज म्हणजे वाटा चुकलेल्या गुणवंतांचा मेळाच.
हा अतिष पतवारी , त्यान जन्मापासूनच नट व्हायचा घ्यास घेतलाय. कॉलेजच्या नाटक कंपनीचि धुरा पत्या एकहाती सांभाळतो. यावर्षी फिरोदिया मारायचच ह्या ध्यासान त्याला पछाडलेल आहे. दिवसभर पहिल्या मजवल्यावरचा ड्रॉईंग हॉल मधे यांच काहीतरी सुरू असत. हॉस्टेल मधे आल्यावरही आरशामोर उभा राहून मार्लोन ब्रांडो सारखा घोगरा आवाज काढत तो डायलॉग बडबडत राहायचा. विकी आणि पत्याच्या तासांतस गप्पा चालायच्या. विकीला सिनेमॅटोग्राफीच वेड होत. रामगोपाल वर्मा टायरला कैमरे लावून घेतो तसे शॉट कसे घेतात,साय-फ़ाय फिल्म्स चित्रित करण्यासाठी कुठली नवीन तंत्रज्ञान जगात आहेत इथपासून ते अमूक तमूक फिल्म कुणि शूट केली इथपर्यंत सगळी इत्यंभुत माहिती त्याच्याकड मिळायचि. विकी आणि पत्या एकत्र सिनेमा,नाटक बघायला बसले की त्याच पोस्टमार्टमच झालच म्हणून समजा. समविचारी आणि सम:दुखी माणस एकमेकाच्या फार जवळचि असतात.
सई समोरून चालत जरी आली तरी रॅम्प वॉक करत येतिये अस वाटायच इतक मॉडलिंग तिच्यात भिनल होत.    अलिबागच्या लेटेस्ट फोटोशूटचा अल्बम आम्हाला तिन फार उत्साहाने दाखवला होता. फोटो पाहून झालेले 'कैसी जिभ लपलपाई' टाइप चेहरे बघून तिन आम्हाला 'ह्ये गाइज प्लीज कुठ बोलू नका हा हे,बाबाना कळल ना तर हाय हिल्स नेच मारतिल मला' अशि ताकीदवजा विनंती केलि. तिचा बाबा आमच्याच कॉलेजात प्रोफेसर होता.
भूषाला त्याच्या अकरावी-बाराविच्या मोहिते सरांसारख गणिताच प्राध्यापक व्हायच होत. पोराना गणित आणखी सोप करून शिकवायच होत. पण त्याच गणिताकडून घात झाला आणि मॅथ्सला जास्त मार्क्स आल्यामुळे सीईटिचा स्कोर दिडशेच्या घरात गेला. एवढे कच्चून मार्क्स भेटल्यावर बि.एसी ला प्रवेश घेन हा गुन्हा आहे. कुठल्या तरी लांबच्या मामान आमच कॉलेज सुचवल. आजही तो कधीमधे बॅग  मधे अर्धवट भरूलेला बी. एसी एडमिशनचा फॉर्म बघून हळहळत असतोय. ते अपुर स्वप्न अजुन त्यान जपून ठेवलय. आमच्या सारख्यांचा एम्-2 सुटला तो भूषाच्याच शिकवन्यान !
एकनाथ चौरे उर्फ़ नाना यांची तर कथाच वेगळी. आख्या गावातून इंजीनियरिंगला आलेला हा पहिला पोरगा. पण ह्याच मन अजूनही गावातच रमत. अॅग्री करून घरच्या शेतित नवनविन प्रयोग करायच मनात होत त्याच्या. पण 'शेती करून कुणाच भल झालय,पोरगी  कोण द्यायच रताळ्या तुला ?' अस म्हणत बापान इकड़ पिटाळून दिल. नानाला सबमिशन पेक्षा म्हशीन रेडकाला पाजल की नाही,दोन आठवडे झाले तरी फाट्याला पाणि कस काय येईना याचीच जास्त काळजी लागलेली असायची. कधि गावाकडच्या आठवणीत दुःखी असलेला नाना दिसला की पोर त्याला 'अरे ह्याला कुणीतरी शेना-मुताच्या वासाचा बॉडी स्प्रे द्यारे आणून म्हणजे हा खुश राहिल' असले काहीतरी टोमने मारत आणखी चिडवायची.
इथ असच आहे. कुणाला ग्रेसच्या कवितांवर पि. एचडी करायची आहे, मुक्त पत्रकार म्हणून काम करायचय,एखाद्याला गायक,क्रिकेटर व्हायचंय. ज्याला खरच मॅक्यानिकल करायचि इच्छा होती त्याला एक-दोन मार्क्स कमी भेटल्या मुळ दुसऱ्या शाखेत इंजीनियरिंग कराव लागतय. कुणाला डॉक्टर व्हायच होत पण नियतीने या चक्रात ढकलल. आणि त्यात भरीस भर म्हणून आमच्या सारख्या 'ऐमलेस' लोकांची निवांत आणि दिशाहीन जमात. ह्या अशा सगळ्यामुळ 'विविधतेत एकता' हे मुल्य घेउन जगणारी इंजिनयरिंग ही शिक्षण क्षेत्रातली एकमेव विद्याशाखा आहे.
रात्री होस्टेलच्या गच्चीत पतवारी एकटाच उभा असलेला दिसला. 'काय पत्या आज काय इथ एकांताला सोबत घेउन एकांकेचि तालिम चालू आहे की काय' अस उसनच म्हणत त्याला विचारांच्या तंद्रीतुन बाहेर काढल.
'कुठलि तालीम आणि कसल काय. हेल्पलेस झाल्यासारख वाटतय. आज वडिलानि जाम खरडपट्टी काढली प्लेसमेंटला का बसत नाही,पुढचा काही विचारच केलाय का हे असल नेहमचिच बोलण. जॉब वगरे नाही पटत नाही रे, पूर्णवेळ थिएटर करायची इच्छा आहे माझी. जाऊदेत साला त्यांच तरी काय चुकत म्हणा..'
'मग इकडे कशाला आल रे तू तिकडच जायच की तसल एन्एस्डी वगरे..'
'आता वाटतय तस,पण खर सांगू का..साला इथं इंजिनियरिंगला आल्यावरच कळत की आयुष्यात आपल्याला नेमक काय करायला पाहिजे होत..!' उगाचच हसत त्यान उत्तर दिल.
इथ असच आहे. सई,नाना,भूषा,पतवारी सारख्या विविध गुणधर्म असलेल्या कितीतरी नद्या ह्या इंजिनियरिंग नावाच्या समुद्राला येउन मिळतात आणि त्यातच बेमालुमपणे मिसळून जातात. दोन रंग एकमेकात मिसळल्यावर कितीहि मोहक छटा तयार झालि तरीही तयार झालेल्या नव्या रंगाला स्वत:च मुळ अस्तिव राहत नाही. या नद्यांचही तसच होत. चार वर्षात इंजिनियरंगचा समुद्र या नद्याना पूर्णपणे एकरूप करून घेतो आणि अशि काही नविन ओळख देतो की पुन्हा आयुष्यभर नदिलाही विसराव लागत की आपला नैसर्गिक गुणधर्म , आवडीनिवडी काय होत्या.

- अक्षय मासाळ
#HappyEngineer'sDay